अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  मागील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट आणि तिकडून ताशी 4 ते 5 किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवत आहे.

तसेच महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर सुरू असून, पूर्व भारत आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढणार आहे. आज पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत पुण्यातील किमान तापमान किंचित वाढलं आहे.

यासोबतच इंदापूर (12.5), माळीण (12.6), एनडीए (12.6), हवेली (12.7) आणि राजगुरूनगर याठिकाणी (12.8)  अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुण्यात इतर ठिकाणी किमान तापमानाचा पारा 13 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदला आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्‍याची थंडी कायम आहे. सगळीकडे वाढत्या थंडीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमानात 3 अंशांची घसरण झाली आहे. काल येथील किमान तापमान 10.5 अंशावर होतं, आज हेच तापमान 7.6 अंशावर पोहोचलं आहे.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर आणखी दाट झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतं आहे. बुलडाणा जिल्ह्यात दाट धुके पडल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहतुकीला ब्रेक लागला आहे.

तसेच रेल्वेसेवा देखील प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर देखील होणार आहे. दरम्यान, सातपुड्याच्या दुर्गम भागात थंडीची लाट कायम असून, दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुढील 2-3 दिवस थंडीचा जोर असाच कायम राहणार आहे.

त्यामुळे आणखी काही दिवस थंडी जोर पहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून केलं जात आहे. दरम्यान, थंडीतही पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. राज्यात अनेक भागांत तापमान किमान 0 डिग्री झालं आहे.