अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  भिस्तबाग परिसरातील फणसे मळा भागातील एका ग्राहकाने वाढीव बिले आल्याची तक्रार महावितरणकडे दिली. मात्र त्याची दखल न घेता त्या ग्राहकास नवीन वीज जोड घेण्यास भाग पाडले.

दुसरा वीज जोड पूर्वीच्या डीपीवरून न देता दुसऱ्या डिपीवरुन दिले. एकाच घरात दोन वेगवेगळ्या वीज खांबावरुन वीज जोड देण्यात आला.

एकाच घरात दोन वेगवेगळ्या न्यूट्रल लाईन एकत्र आल्यावर मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. फणसे मळा भागातील आनंद रुपनर यांना जानेवारी २०२१ चे वीज बिल वाढीव आले.

याबाबत त्यांनी महावितरणच्या भिस्तबाग येथील कार्यालयात तक्रारी दिली. या कार्यालयातील वायरमनने ते मीटर फॉल्टी आहे, असे सांगून रुपनर यांना नवीन वीज जोड घेण्यास भाग पाडले.

नवीन वीज जोड हा पूर्वीच्या डीपीवरून न देता वेगळ्या भागातून आलेल्या डिपीवरुन दिला. एकाच घरात दोन वेगवेगळ्या वीज खांबावरुन देण्यात आले.

याबाबत संबंधित अभियंत्यास सांगितले असता त्याने हा प्रकार पाहण्याची तसदी देखील घेतली नाही. एकाच घरात दोन वेगवेगळ्या न्यूट्रल लाईन एकत्र आल्यावर मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची भिती निर्माण झाली आहे.

महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळण्यासाठी व होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक थांबवण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना दिले.