अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Ahmednagar Police)

दरम्यान करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना हद्दीत कारवाई करण्यात येत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे.ओमिक्रॉन आणि कोविडच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक प्रतिबंध लागू केले आहेत.

याबाबतची नियमावलीही जाहीर झाली आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

दरम्यान नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात तोफखाना पोलिसांनी रविवारी सकाळपासून नाकेबंदी करीत विनामास्क वाहनचालकांना अडवून दंड वसूल केला.

गेले दोन ते तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवसांत सुमारे 53 हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.