अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.

तसेच तोपर्यंत नितेश यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता.

या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता.

मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नितेश राणे यांच्या या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणेंच्यावतीनं जेष्ठ कायदेतज्ञ नितीन प्रधान यांचा युक्तिवाद केला.

तर या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकच्या वतीने नितेश राणे यांच्यावर आरोप करत म्हटलं, नितेश राणे हेच या हल्यामागचे सूत्रधार आहेत.

आम्हाला यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्यावी अशी राज्य सरकारकडून परवानगी मागण्यात आली. राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली.

तसेच पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार नाही अशी ग्वाहीही राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता होणार आहे.