file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वंचित आदिवासी समाजातील घटकांची उपासमार होऊ नये, याकरिता मोफत धान्याचे वाटप करण्याबाबतच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

मात्र, आदिवासी समाजाविषयी अनास्था असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून आदिवासी पारधी समाजातील लोकांवर अन्याय होत असल्याबाबतचे निवेदन श्रीगोंदे तहसील कार्यालयामध्ये देण्यात आले.

बेलवंडी बुद्रूक येथील बबन खिशमिशा भोसले हे सचिन हौसराव लबडे याच्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांनी मोफत धान्य देण्यास नकार दिला.

तुम्हाला कोठे जायचे तेथे जा, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही, या भाषेत शिवीगाळ केली. याच वेळी संबंधित दुकानदार मात्र आदिवासी पारधी समाजातील लोकांना मोफत धान्याचे वाटप न करता काळ्या बाजारात धान्याची विक्री करत असल्याचे समोर आले.

याबाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी सुनीता बबन भोसले यांनी निवासी नायब तहसीलदार नांदे यांना निवेदनाद्वारे केली.