file photo

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :-  रशियात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. चोवीस तासांत ३६ हजार ३३९ जणांना बाधा झाली आहे. १०३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याच्या एक दिवस आधी देखील १०२८ जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत २.२७ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिस्थिती लक्षात घेऊन राजधानी मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी शहरात ११ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

या काळात शाळा-महाविद्यालये, कार्यालये, रेस्तराँ, सिनेमाहॉल, कॅफे, जिम, मनाेरंजन केंद्रांसह सर्व कमी गरजेच्या सेवा २८ ऑक्टोबरपासून बंद राहतील.

तत्पूर्वी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत काम बंद राहील, अशी घोषणा केली होती. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सुमारे ५० हजार रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

ब्रिटनसह युरोपीय देशांत आता डेल्टाचे नवे व्हेरिएंट आढळून आले आहे. या व्हेरिएंटचे नाव एवाय.४.२ आहे. हा मूळ डेल्टा व्हेरिएंटपेक्षा १०-१५ टक्के जास्त धोकादायक मानला जातो.

परंतु त्याचा फैलाव मोठ्या पातळीवर होणे शक्य नसल्याचे वैज्ञानिकांना वाटते. जागतिक आरोग्य संघटनेसह इतर संघटना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टच्या यादीत समाविष्ट करण्यावर विचारविनिमय करत आहेत.

एवाय. ४.२ अनेक देशांत आढळून आला आहे. त्याचे स्पाइक प्रोटीनमध्ये दोन म्यूटेशन वाय १४५ एच व ए २२२ व्ही आहे. दोन्ही म्युटेशन्स अनेक ठिकाणी आढळून आले आहेत. जगभरातील काही भागात प्रसार कमी झाला आहे.