अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. नगर तालुक्यात मात्र अद्यापपर्यंत कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येते.

सद्यस्थितीत नगर तालुक्यात २४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरशा हाहाकार केला होता. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवला होता.

त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नगर तालुक्यातील एकशे दहा गावांपैकी २४ रुग्ण सक्रिय असल्याने कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.

परंतु ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज पर्यंत तालुक्यात १७ हजार ९०३ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. तर ७१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ रुग्ण सक्रिय आहेत.

सर्वाधिक मृत्यू हे जेऊर आरोग्य केंद्राअंतर्गत १३७ तर सर्वात कमी मृत्यू रुईछत्तीसी व मेहकरी आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी ४२ झाले आहेत.

नगर तालुक्यातील कोरोना चा मृत्यू दर हा चार टक्के आहे. सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत तर सर्वात कमी रुग्ण रुईछत्तीसी आरोग्य केंद्रांतर्गत आढळून आलेले आहे.