अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाने घरातील कर्ता पुरुष मयत होऊन विधवा झालेल्या महिलांना राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता व्यवसायासाठी जागा व बँकेतून कर्जाच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करुन देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

या मागणीसाठी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी दि.2 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोना महामारीत राज्यात अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष दगावले गेले.

नुकतेच लग्न झालेले युवक देखील कोरोनाने मरण पावले. अनेक महिला विधवा झाल्या असून, त्यांच्यापुढे मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अशा अनेक कुटुंबाची सध्या उपासमार सुरु आहे. केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या वारसांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

परंतु ती मदत फार तुटपुंजी असून, या रकमेतून त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक प्रश्‍न सुटू शकणार नाही. हजारोंच्या संख्येने विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या कुटुंबाचे प्रश्‍न सुटू शकणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्या मालकीच्या बाजारपेठेतील जागा किंवा राज्य सरकारच्या मालकीची तसेच महामार्गा शेजारी असलेली जागा अशा विधवा महिलांना पंधरा बाय पंधराचे व्यवसायिक गाळे उभारण्यासाठी अल्पदरात जागा दिल्यास,

महिला भाजी, फळे व इतर साहित्य विक्री करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकणार आहेत. तसेच त्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज रुपाने भांडवल देण्याची गरज आहे.

सरकारने देऊ केलेल्या मदतीद्वारे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न सुटणार नसून, ही जाणीव लक्षात घेऊन राज्य सरकारने विधवा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाचा प्रश्‍न सुटणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

या मागणीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.