अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमागे कोरोना हातधोवून लागल्याचं दिसून येत आहे.

एकामागे एक असे करत कोरोनाने आता जिल्ह्यातील सहावे मोठे नेते भाजपचे अनुसूचित जमातीचे राष्ट्रीय मंत्री व तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. याआधी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे हे सध्या कोरोनाचे उपचार घेत आहेत.

अशातच आता भाजपचे आणखी एक नेते कोरोना बाधित आढळून आले आहेत. वैभव पिचड हे कोरोना संक्रमित झाले आहे. या संदर्भातील माहिती त्यांनीच समाजमाध्यमांना दिली आहे.

त्यांना अकोले येथील डॉ. भांडकुली यांच्या रुग्णालयातून मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी हलविले असून ते राजूर येथून मुंबईकडे जात असताना त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला आहे.

पुढे बोलताना पिचड म्हणाले की, तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्यामध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष घालेल.

कोरोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकानी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. नगरपंचायत निवडणुकीत मला जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता पुढील चार प्रभांगातील मतदारांनी भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आपले आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.