अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
त्यात मागील १९ दिवसांत दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे राज्यात या विष्णूचा धोका वाढत असल्याचे भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान याबाबतची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या सर्व प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केली जात असल्याची माहिती देखील यावेळी ठाकरे यांनी दिली आहे.
युरोप, दक्षिण आफ्रिका अशा काही देशांमध्ये कोविडचा प्रसार पुन्हा एकदा वाढला आहे. दक्षिण आफ्रिका व अन्य काही देशांमध्ये ओमायक्रॉन हा घातक विषाणू आढळून आला आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबरपासून मुंबईत मागील १९ दिवसांच्या कालावधीत एक हजार प्रवाशी आले आहेत.
या सर्व प्रवाशांचा संपर्क क्रमांकाची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जाणार आहे.