अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होताना दिसत आहे. त्यासोबतच लसीकरणही वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालये येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाने यासंदर्भातला निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार काही ठिकाणी या शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही ठिकाणी तो अद्याप प्रलंबित होता.
या पार्श्वभूमीवर पुण्याबाबत नेमका काय निर्णय होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण ग्रामीण भागात चांगले सुरू आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी दोन्ही डोस घ्यायला हवेत. 9वीपासून शाळा सुरू होणार आहेत. पुण्यात आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोनासंदर्भातली आढावा बैठक झाली.
यावेळी पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुण्यात रुग्णसंख्येत घट होत असल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, रुग्णसंख्येत घट होत असताना पुण्यातील शाळा-महाविद्यालयांचं काय होणार?
असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यासंदर्भात येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं.
मात्र, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग फक्त चार तास भरतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांनी घ्यावा मुंबई प्रमाणेच आता पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट कमी होताना दिसतेय.
असे असले तरी लोकांनी काळजी घ्यावी. मुलांना शाळेत पाठवायचा निर्णय हा पालकांनीच घ्यायचा आहे. कोणतीही सक्ती नसेल. सुरूवातीला शाळेत येण्याचं कोणतंही बंधन नसेल असंही अजित पवारांनी म्हटलं आहे