कोरोनावर ९० टक्के गुणकारी लस किंमत अवघी ७३० रुपये प्रतिडोस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-रशियाने कोरोनाविरोधात विकसित केलेल्या स्पुटनिक-व्ही नामक लसीला मार्च महिन्यात मंजुरी मिळू शकते. ही लस भारताला १० डॉलर म्हणजे सुमारे ७३० रुपये प्रतिडोस या दराने मिळेल.

ही लस कोरोनावर ९० टक्के गुणकारी असल्याने या महामारीविरोधी लढ्यात ती महत्त्वाची ठरेल. सध्या देशात ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायटेकने विकसित केलेली स्वदेशी कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर करण्यात येत आहे.

कोविशिल्डचे उत्पादन पुण्यात सीरम इ्स्टिटट्यूट करत असून, या लसीचा एक डोस सरकारला २१० रुपयांना मिळतो. बाजारात ही लस १ हजार रुपयांना मिळेल, असे सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी सांगितले आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन २९५ रुपये प्रतिडोस या दराने सरकारला दिली आहे.

त्या तुलनेत रशियाची स्पुटनिक-व्ही महाग असली तरी ही लस कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा अधिक प्रभावी असल्याने कोरोना लसीकरण मोहिमेत तिची निर्णायक भूमिका असेल. कोविशिल्ड ७० टक्के प्रभावी आहे. तर कोव्हॅक्सिनच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असल्याने तिची नेमकी गुणवत्ता स्पष्ट झालेली नाही.

स्पुटनिक-व्ही कोरोनावर ९० टक्के प्रभावी आहे. सध्या केवळ मॉर्डना आणि फायझर या दोन अमेरिकन कंपन्यांच्या लसी ९० टक्क्यांहून अधिक गुणकारी आहेत. मात्र, या लसींची किंमत रशियन लसीच्या तुलनेत तिप्पट आहे.

शिवाय अमेरिकन कंपन्यांच्या लसी उणे तापमानात साठवाव्या लागत असल्याने त्यांचे व्यवस्थापन अवघड आहे. त्या तुलनेत रशियन लस कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनप्रमाणे २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठवली जाऊ शकते.

अहमदनगर लाईव्ह 24