Corona News : मागील तीन वर्षांत जगभरात थैमान घालणारी कोरोना महामारी आता आपत्ती राहिली नाही. परंतु या विषाणूचा जागतिक आरोग्यासाठी अजूनही धोका कायम आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी शुक्रवारी दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसीन सेवा आणि जगातील सर्वात मोठी विमा योजना ‘आयुष्मान भारत’ सुरू केल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले. गुजरातची राजधानी गांधीनगर येथील महात्मा मंदिर संमेलन केंद्रात आयोजित ‘जी-२०’ देशाच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले की, अलीकडच्या काळात कोरोना विषाणूच्या ‘बीए २.८६’ या नव्या व्हेरिएंटची ओळख पटली आहे. अनेकदा त्याचे रूप बदलले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशांनी खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. ‘महामारी करारा’ ला अंतिम रूप देण्याची प्रक्रिया गतिमान करावी. त्यानंतर, पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक आरोग्य सभेत त्याला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.