अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने शिर्डी शहरातील दीड हजार व्यावसायिकांची कोरोना तपासणी केली आहे.
विशेष बाब म्हणजे यामध्ये 57 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.
शिर्डी नगरपंचायतच्यावतीने दि.01 जानेवारी ते 10 जानेवारी यादरम्यान शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार, व्यावसायीक यांची आरटीपिसीआर तसेच अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहे.
नगरपंचायत तसेच खाजगी लॅबमधील चाचण्यांमध्ये शिर्डी शहरासह 37 रुग्ण करोनाबाधित आढळून आले होते. दि. 10 रोजी शहरातील व्यावसायीकांच्या केलेल्या आरटीपिसीआर चाचणी तपासणीमध्ये शिर्डी शहरातील 18 रुग्ण नव्याने बाधित झाले आहे.
त्यामुळे आता ही संख्या 43 वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी निर्बंधांबाबत आदेश दिले आहे.
त्यानुसार शिर्डी शहरातील दुकानदार तसेच भाविक यांनी तोंडाला मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे.
दरम्यान शिर्डी शहरात पहिल्या डोससाठी 78 टक्के नागरिकांनी लसिकरण केले असून दुसर्या डोससाठी उर्वरित नागरिकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन शिर्डी नगरपंचायतच्यावतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले आहे.