कोरोनाने सध्या अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. परंतु काही सकारत्मक गोष्टीही त्याठिकाणी घडत आहे, 29 वर्षांचा एका तरुणाने कोरोनाशी कडवी झुंज देत मृत्यूच्या दारातून माघारी आल्याची घटना घडली आहे.
हा तरुण कोव्हिड पॉझिटिव्ह निघाला. 8 दिवस तो व्हेंटिलेटरवर असल्याने घरच्यांनी आशा सोडली होती. परंतु अशा परिस्थितीतून कोरोनाशी यशस्वी लढा देत तो ठीक झाला आहे.
प्लाझ्मा थेरेपीसाठी आपलं रक्त देण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. फ्रांन्सिस विल्सन असं या तरुणाचे नाव आहे. The Washington Post ने याबाबतचं वृत्त प्रसारित केले आहे. 29 वर्षांचा फ्रांन्सिस हा कायद्याचा विद्यार्थी आहे.
तब्येत बिघडल्यानंतर त्याने टेस्ट केली व तो पॉझिटिव्ह आढळला. हॉस्पिटलमध्ये काही दिवसांच्या उपचारानंतर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. त्याच्या रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण एकदम खाली गेलं होतं.
डॉक्टर्स आणि नर्सेसनी त्याच्या जगण्याची आशाच सोडली होती. फ्रांन्सिसचे फक्त श्वास सुरू होते.डॉक्टरांनी त्याच्या पालकांना बोलावून घेतलं आणि फ्रांन्सिस आता शेवटच्या घटका मोजत असल्याचं सांगितलं.
त्याचा शेवट सुखात व्हावा म्हणून त्यांनी चर्चमधून एका फादरलाही बोलावून घेतलं होतं. शेवटची तयारी सुरू होती. शेवटी नर्सने फ्रांन्सिसच्या कानाजवळ फोन लावला. त्याची आई, वडिल, बहिण त्याच्याशी बोलले.
त्याला काहीच कळत नव्हतं. काही वेळ गेल्यानंतर चमत्कार घडल्यासारखं त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. त्या शेवटच्या क्षणांमध्ये आपल्याला अनेक स्वप्न दिसत होती.
काही वेगळे असे अनुभवही आले असं फ्रांन्सिसने सांगितलं आहे. फ्रांन्सिस आता ठणठणीत बरा झालाय. त्याला आणि कोरोनारुग्णांच्या प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तदानही करायचं आहे.
डॉक्टरही अचंबित झाले होते. त्यांनी लगेच औषधं बदलून दिली आणि काही तासातच फ्रांन्सिसमध्ये सुधारणा झाली. आणखी दोन दिवसांच्या औषधोपचारानंतर त्याने आपल्या आईला पहिला मेसेज केला, “Mom, I’m alive.”