अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- मुंबईतील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी, मुंबईसह महाराष्ट्रात ओमिक्रॉनची (Omicron) लाट आल्याचे आजच्या आकडेवारीवरून तूर्तास तरी दिसते.
राज्यात शुक्रवारी ४३, २११ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. तर २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. एकट्या पुण्यातच गेल्या २४ तासांत १९७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे.
तर मुंबईत आतापर्यंत एकूण सहाशेहून अधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. करोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनची रुग्णसंख्या कमी झाली होती. गुरुवारी तर राज्यात एकही ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली नव्हती.
मात्र, आज शुक्रवारी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.
एकट्या पुणे महापालिका क्षेत्रात १९७ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी ३, मुंबईत २ आणि अकोला येथे १ ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली.
मुंबईत आतापर्यंत एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ही ६२९ झाली आहे. तर त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात एकूण ५२६, पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण १०७, तर सांगलीत एकूण ५९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण १६०५ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.