अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण वेगाने वाढले पाहिजे.
यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना दिले. कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण राज्यात हळूहळू वाढू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे.
त्यासाठी आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजेत यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
गेल्या १२ तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात ४५ टक्के वाढ झाली असून ५४ देशांत याचा प्रसार झाला आहे.
महाराष्ट्राने सध्या १२ कोटी ३ लाख १८ हजार २४० डोसेस दिले असून ४ कोटी ३७ लाख ४६ हजार ५१२ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत,
तर ७ कोटी ६५ लाख ७१ हजार ७२८ लोकांनी एक डोस घेतला आहे. ४५ वयाखालील व वरील अनुक्रमे ७६.६९ आणि ८५.२५ टक्के लोकांनी एक डोस घेतल्याची माहिती बैठकीत देण्यात आली .