अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नव्या नियमांची माहिती दिली.
राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक काळजी घेण्याची आणि कदाचित निर्बंध अधिक कडक करण्याची गरज पडू शकते. याबाबत येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी टोपे यांनी कोरोना रुग्णवाढीची आकडेवारीची माहिती देत राज्यात हळूहळू चिंताजनक वातावरण निर्माण होत असल्याची जाणीव करुन दिली. नागरिकांनी आता गाफील राहू नये. गेल्या सात दिवसांत रुग्णवाढीचा दर झपाट्यानं वाढताना दिसतोय, असं राजेश टोपे म्हणाले.