अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- कोरोनानंतर जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढू लागला आहे. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा पहिला मृत्यू झाल्याबाबत स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी माहिती दिली. पश्चिम लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली.
ओमायक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले.
ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने ब्रिटनमध्येच नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. 30 वर्षांवरील व्यक्तींना हे बुस्टर डोस दिले जात आहेत.
देशात ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य अधिकार्याने दिली.
ओमायक्रॉनचा धसका वाढलेला असताना सर्वच देशांनी आपापल्या आरोग्य यंत्रणा अद्ययावत करताना ओमायक्रॉनला अटकाव करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहे. दरम्यान महाराष्ट्रात ओमायक्रॉनबाधितांची संख्या २० वर पोहचली आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.