कोरोना व्हायरस

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासन झाले सतर्क

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आलेल्या विविध तालुक्यांतील 27 पैकी 25 जणांपर्यंत पोहचण्यात प्रशासनाला यश आले आहे.

यात श्रीरामपूरात दुबईहून एकाच कुटुंबातील चौघेजण आले असता त्यांचा शोध घेऊन तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली.

त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप एक तपासणीचा अहवाल येणे बाकी आहे. त्यांचा तो शेवटचा अहवाल आल्यानंतर ते निगेटीव्ह का पॉझिटीव्ह याबाबत निर्णय कळणार आहे. तोपर्यंत या चौघांंनाही सुरक्षितता म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील या चौघांचा दुबईहून येतांना मुंबई व श्रीरामपूरात ज्यांच्याशी संपर्क आला त्यांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.

त्यामुळे याबाबत पूर्णपणे काळजी घेतली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात 3 डिसेंबरला 15 व्यक्ती बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले होते.

यात कोपरगाव 2, राहाता आणि राहुरी प्रत्येकी 3, संगमनेर 1, श्रीरामपूरात 4 आणि नगर मनपा हद्दीतील दोघांचा समावेश होता. तर 5 डिसेंबरला अकोलेत 4, कोपरगाव 2, राहाता 1 आणि नगर मनपा हद्दीतील 5 जणांचा यात समावेश आहे.

दोन दिवसात जिल्ह्यात 27 जण बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले आहेत. यातील 25 जण सापडले असून उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू आहे.दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office