अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी सर्वच देशांमध्ये विविध उपाययोजना केल्यात जात आहेत. त्यासाठी काही नियम देखील आखून दिले आहेत.
अनेक देशांमध्ये मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने मास्कचा वापर न केल्यास दंड देखील ठोठावण्यात येतो.
मात्र चिली देशाच्या राष्ट्रपतींनाच दंड ठोठावण्यात आला. त्यांनी एका महिलेसोबत सेल्फी घेतला. मात्र, त्यांनी मास्कचा वापर केला नसल्याचे समोर आले होते.
चिलीचे राष्ट्रपती सॅबेस्टीयन पिनेरा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. अखेर मास्कचा वापर न केल्याबद्दल राष्ट्रपतींनी माफी मागितली.
एका वृत्तानुसार, राष्ट्रपती पिनेरा यांच्याकडून जवळपास ३५०० डॉलरचा (दोन लाख ५७ रुपये) दंड वसूल करण्यात आला. राष्ट्रपती पिनेरा यांनी सांगितले की, आपल्या घराबाहेर असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना
एका महिलेने सेल्फी काढण्याची विनंती केली. तिच्या विनंतीनंतर सेल्फी काढला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या फोटोत ते दोघेही मास्कशिवाय असल्याचे दिसून आले. त्यानुसार राष्ट्रपतींना दंड ठोठावण्यात आला.