अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राज्यात आज तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन…. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत.
अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या.
तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल. राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण 90 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 62 टक्के आहे. तरीही आपण देशाच्या सरासरीपेक्षा थोडं कमी आहोत, हे योग्य नाही. राज्यात लसीकरणाचं प्रमाण कमी होता कामा नये.
लसीकरणाची गती वाढायला हवी. त्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लसीकरणासाठी पुढे आणलं पाहिजे. लसीचा तुटवडा जाणवतोय… कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसी आम्हाला कमी पडत आहेत.
त्याबाबत आपण केंद्र सरकारला कळवणार आहोत. लसीचा पुरवठा करण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तर ऑक्सिजनची एकूण मागणी 400 मेट्रिक टन आहे. त्यात कोविड आणि नॉन कोविड आहे.