कोरोनाशी लढण्यासाठी ‘इम्युनिटी’ पॉवर वाढवायचिये? अशी ठेवा आहारपद्धती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बदलती आधुनिक जीवनशैली वेगवान होत चालली आहे. त्याचा परिणाम आपल्या आहारावर होतो. आज काय खावे याची निवड करण्यापासून ते शिजविण्यापर्यंत कोणत्याही बाबतीत फारशी जागरुकता दिसत नाही किंवा त्याकडे पुरेसे लक्ष पुरविले जात नसल्याचे वास्तव आहे.

जेव्हा आपण सात्विक आहारपद्धती स्वीकारतो तेव्हा आपले मन अधिक सजग होते. सात्विक स्वभावाची व्यक्ती ही शांत, अक्षुब्ध, अविचलित, प्रसन्नचित्त असते. तिच्यामध्ये ऊर्जा, आरोग्य आणि सर्जनशीलतेचा संचार असतो व तिचे व्यक्तिमत्व संतुलित असते. या आहारपद्धतीमुळे वजनही आटोक्यात राहते.

आपल्या आरोग्याचा आणि रोगप्रतिकारशक्तीचा बराचसा भाग हा आपले विचार आणि मनोवृत्ती यांच्यावर अवलंबून असतो. आदर्श स्थितीमध्ये सहसा आपले अन्न आपणच शिजवावे. कारण त्यामुळे केवळ तुमचे सकारात्मक विचार आणि चांगली ऊर्जा तुमच्या अन्नामध्ये संक्रमित होईल. पदार्थ बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया ही सजग मनाने केलेल्या ध्यानधारणेसारखी असावी.

ते काम यंत्रवत उरकून टाकणे उपयोगाचे नाही. अन्न शिजवताना तसेच खाताना आपले मन प्रेम, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांनी भरलेले असले पाहिजे. या साध्याशा बदलामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. सात्विक आहार घेतल्याने तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला बळ मिळू शकेल व तुमचे आरोग्य चांगले राहील.

सात्विक म्हणजे शुद्धता, स्वास्थ्य, एकतानता आणि आरोग्य. सात्विक आहारामुळे तुमचे शरीर आणि मन संतुलित राहील आणि तुम्हाला हलकेफुलके वाटेल.

संपूर्ण शाकाहार, यात मोसमी आणि ताजी फळे व भाज्या, डाळी, अखंड धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, बिया, ताज्या हर्ब्जचा तसेच मध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे म्हणजे सात्विक आहार घेणे होय.

शक्यतो कच्च्या भाज्या आपल्या अहरमध्ये असणे आरोग्यादयेई असते. कारण शिजविल्याने त्यातील पोषक घटकांची हानी होते. सात्विक आहार अतिशय हलकाफुलका आणि पोषक असतो, ज्यामुळे त्याचे सहज पचन होते.

अशाप्रकारचे अन्नपदार्थ रोगप्रतिकारकशक्ती, ताकद, उत्साह आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अर्थात याचा अर्थ तुम्ही वर सांगिलतेले सगळे पदार्थ हवे तेवढे खावेत, दिवसभर काही ना काही अखंडपणे तोंडात टाकत रहावे असा नाही.

योगशास्त्रामध्ये मिताहाराची शिफारस केली आहे. मिताहार म्हणजे बेताचे खाणे. आपल्या पोटाचा अर्धा भाग सघन आहाराने तर एक चतुर्थांश भाग द्रव पदार्थाने भरायला हवा आणि उर्वरित एक चतुर्थांश भाग रिकामा सोडायला हवा म्हणजे उदरातील वायूंस हालचाल करण्यास पुरेशी जागा राहील.

अन्न सेवन करण्यापूर्वी अन्नाप्रती कृतज्ञतेची भावना मनात आणण्याची सवय लावून घ्या. खाल्लेल्या अन्नातून जास्तीत जास्त पोषण मिळवायचे असेल तर ते हळूहळू आणि लक्षपूर्वक खायला हवे.

जेवताना खूप पाणी पिऊ नये कारण त्यामुळे जठराग्नी विझून जाईल. या छोट्याशा कृतीचाही तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.

बहुतांश आजार हे पहिल्यांदा आपल्या पचनयंत्रणेतच जन्म घेतात. तेव्हा आपण योग्य खाण्याची, वेळेवर खाण्याची आणि आपल्या पचनसंस्थेला पचनक्रियेसाठी पुरेसा वेळ देण्याची खबरदारी घ्या. केवळ आहाराच्या सवयी बदल्याने आरोग्याच्या कितीतरी समस्यांवर यशस्वीपणे मात करता येते.

अहमदनगर लाईव्ह 24