अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपाससून साईमंदिराचे दरवाजे बंद होते. यामुळे भक्त देखील बाबांच्या दर्शनापासून वंचित राहिले होते.

मात्र आता हि प्रतीक्षा संपली असून लवकरच शिर्डीमधील साई बाबांचा दरबार भाविकांसाठी खुला होणार आहे. शिर्डीतील जगविख्यात साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले असून

केवळ 24 तास शिल्लक राहिले आहेत, त्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानच्यावतीने साई दर्शनासाठी दिवसाला पंधरा हजार दर्शन पासची व्यवस्था भाविकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती श्री साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या 19 ते 20 महिन्यांच्या कालावधीत साई मंदिर दोन वेळा बंद झाले. यामध्ये शहरातील अनेक छोट्या मोठ्या लोकांना आर्थिक फटका बसला आहे.

त्यामुळे आता मंदिर उघडण्यासाठी फक्त 24 तास शिल्लक राहिले असतांना साईमंदीर खुले होण्याकडे शिर्डी ग्रामस्थांची आस लागून राहिली आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर दि. 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे खुले करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे.

शिर्डी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. शिर्डीकरांना आनंद झाला आहे. दरम्यान तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार यशस्वी ठरले आहे.