नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या विधानावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकारांशी संवाद साधताना हे ठाकरे सरकारला आवाहन दिले आहे.

तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या विधानाचा नवनीत राणा यांनी समाचार घेतला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, हिंमत असेल तर आधी औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb) फुलं वाहणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुम्हाला मानेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) आम्ही हनुमान चालिसा म्हटलं तर आम्हाला जेलमध्ये टाकलं. १३-१४ दिवस तुरुंगात ठेवलं. महिलेशी कशी वर्तणूक केली हेही जगाला माहिती आहे. माझ्या घरावर कारवाई केली. आता ओवैसी हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी काहीही कारवाई केली नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

दरम्यान, दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीतील मंदिरात हनुमान चालिसा पठण करत आहेत. यानिमित्त त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. नवनीत राणांच्या निवासस्थानापासून एक मोठी रॅली सकाळी काढण्यात आली.

या रॅलीत अनेक संत-महंत आणि कार्यकर्ते सहभागी झाले. शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन नवनीत राणा यांनी मंदिराकडे पायी मार्गक्रमण केलं. मंदिरात हनुमान चालिसा झाल्यावर तेथे महाआरतीदेखील करण्यात येणार आहे.