Maharashtra News:डमी एकनाथ शिंदे म्हणून प्रसिद्धीस आलेले पुण्यातील विजय नंदकुमार माने यांच्याविरूदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून फसवणूक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, यावरून कायदे तज्ज्ञांकडून उलटसुलट मते व्यक्त होत आहेत. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) याने मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे.

खंडणी विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, माने याचे समाज माध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून मुळशीतील गुंड शरद मोहोळ याच्याबरोबर समाज माध्यमावर छायाचित्र प्रसारित झाले आहे.

त्यानुसार पोलिसांनी माने विरूद्ध कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) असे गुन्हे दाखल केले आहेत.

याला काही कायदेतज्ज्ञांनी चुकीचे ठरविले आहे. विधीज्ञ असिम सरोदे यांनी म्हटले आहे की, माने हा एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसतो यामध्ये त्याचा काहीही दोष नाही.

तो शिंदेच्या सारखा दिसतो याचा त्याने गैरफायदा घेतला असेल, मीच एकनाथ शिंदे आहे असे म्हणून कुणाची फसवणूक केली असेल तर तो गुन्हा ठरू शकतो व तशी तक्रार ज्याची फसवणूक झाली असेल त्या व्यक्तीने देणे आवश्यक आहे.

जर त्याने एकनाथ शिंदे यांची बदनामी केली असेल तर एकनाथ शिंदे यांनी विजयकुमार माने याच्याविरुद्ध तक्रार देणे आवश्यक आहे. पोलिसांची विजय माने याच्याविरुद्ध कारवाई प्रथमदर्शनी अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची व बेकायदेशीर आहे असे दिसते, असेही सरोदे यांनी म्हटले आहे.