अहमदनगर क्राईम

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून ७० वर्षीय वृद्धाचा झोपेत खून !

Published by
Ahmednagarlive24 Office

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भिमाजी उनवणे या ७० वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला. झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले असता, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर वार करून खून केला.

सोमवारी सकाळी साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येत असताना आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, त्यानंतर तिने आरडाओरोड केला. त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक याने या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलिस कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र घटनास्थळी कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत, अशी माहिती संगमनेर तालुका पोलिसांनी दिली.

घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. या घटनेनंतर झोळे गावात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचून आरोपींचा शोध घेऊ, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेची चौकशी सुरू असून अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिस निरीक्षक देविदास देविदास ढुमणे यांनी सांगितले. मृत साहेबराव उनवणे हे शांत स्वभावाचे होते.

Ahmednagarlive24 Office