समाईक रस्त्यावरून सावत्र आई व कुटुंबाला मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे घडली. याबाबत सहा जणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आशाबाई शहाजी राक्षे (वय ६५ वर्षे, धंदा किराणा दुकान – व शेती, रा गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे, तर सुभाष शहाजी राक्षे, अदित्य सुभाष राक्षे, भाग्याश्री सुभाष राक्षे, वैभव सुभाष राक्षे, संपत भागा पावडे, आलम खान (सर्व रा. गव्हाणवाडी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी यांचा मुलगा संतोष, सून व दोन नातवांसह राहतात. शेजारी त्यांचा सावत्र मुलगा सुभाष शहाजी राक्षे हा कुटुंबासह राहतो. या दोघांमध्ये जाण्या-येण्याच्या रस्त्यावरुन नेहमी वाद होतात.
दि. ६ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास फिर्यादी या रस्त्यावरून आपल्या किराणा दुकानात जात असताना आरोपी व इतर दोघे अनोळखी लोक रस्त्यावर उभे होते. त्यावेळी आदित्य राक्षे हा फिर्यादीला म्हणाला की, ही जागा आमची असून, येथून तू व तुझ्या घरच्यांनी कोणी जायचे नाही.
त्यावेळी त्याला हा रस्ता सामाईक आहे, असे म्हणल्याचा राग येऊन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ओरडण्याच्या आवाजाने सून बाहेर येऊन विचारपूस करीत असताना तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व दोघींना शिवीगाळ केली.
सुनेने पती संतोषला फोन करून बोलावून घेतले, त्याने माझ्या आईला का मारले, असे विचारताच त्याला कोयता, रॉडने मारहाण केली. तसेच फिर्यादी व सून सोडवासोडव करीत असताना भाग्यश्री राक्षे हिने केस पकडून जमिनीवर आपटले.
वैभव राक्षे याने हातातील हातोड्याने व संपत पावडे याने लोखंडी गजाने वाहनाची मागील काच फोडली. याबाबत फिर्याद देण्यासाठी तिघे पोलीस ठाण्यात आले असता, नातू प्रणव राक्षे याला घराच्या पोर्चमध्ये आदित्यने लोखंडी गजाने मारहाण करुन त्याचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून सहा जणांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.