अहमदनगर येथील महाविद्यालय सुटल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या गेटवर अडवून तिची छेडछाड केल्याचा प्रकार लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयासमोर घडला.
याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कृष्णा किरण कांबळे (रा. प्रबुद्ध नगर, भिंगार) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद पिडीत तरुणीने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे.
सदरचा प्रकार हा १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या गेटसमोर घडला होता. आरोपी कृष्णा कांबळे याने त्या तरुणीला गेट वर अडवले व मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला तुला भेटायचे आहे, माझ्या सोबत चल असे तो म्हणाला.
त्यास त्या तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिचा हात पकडून तिच्या सोबत छेडछाड केली. या प्रकाराने सदर तरुणी घाबरली. तिने भितीपोटी घरी काही सांगितले नाही. भीती कमी झाल्यावर तिने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर शुक्रवारी कुटुंबियांच्या समवेत तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी कृष्णा कांबळे विरुद्ध पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.