लोकांना फसवण्याचे अनेक बहाणे व फंडे फ्रॉड लोक शोधून काढत आहेत. आता अहमदनगरमध्ये देखील अशीच एक ठगांची टोळी कार्यरत असून ती लोकांना फसवत आहे. दमदाटीने पालकांकडून पैसे वसूल करून घेत आहे.
तुमच्या मुलाने, मुलीने आमच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असून कर्जाचे हप्ते भरले नाही, तो फोन उचलत नाही म्हणत काही वसुली बहाद्दर मुलांच्या घरी जातात आणि पैशांची मागणी करतात. काही पालक बिचारे घाबरून पैसे देतात.
मात्र, काही जण ठकास महाठक भेटले की तथाकथित वसुली बहाद्दर पळून जातात. अशा अनेक घटना तालुक्यात घडत असून लोकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत अनेकांनी आपले अनुभव कथन केले असून बाहेरगावी नोकरीला अथवा शिक्षणाला असलेल्या प्रतिष्ठीत मुला-मुलींची माहिती काढली जाते.
एखाद्या नामांकित कंपनीचे नाव देत हप्ते थकल्याची बोगस यादी तयार केली जाते. परिसरातील अनेक प्रतिष्ठीत मुला-मुलींची नावे त्यात समाविष्ट असतात. काहींनी हप्ते भरल्याची तथाकथित नोंदही केली जाते. बोगस सह्याही मारल्या जातात. हे सर्व रेकॉर्ड पाहून काही भोळ्याभाबड्या पालकांचा विश्वास बसतो.
इज्जतीचा पंचनामा नको म्हणून बिचारे जवळ आहे, तेवढे पैसे देतात. वसुली बहाद्दर यादीवर पालकांची सही घेऊन हप्ता वसूल झाल्याची नोंद केल्याचा दिखावा करतात आणि पलायन करतात. मग संध्याकाळी मुलगा किंवा मुलगी ड्युटीवरून अथवा कॉलेजवरून घरी आले की फोनाफोनी होते आणि मग मुलगा मुलगी सांगतात की बाबा आम्ही कर्जच घेतले नाही. तुम्ही हप्ता कसा काय भरला? असा प्रतीप्रश्न होतो.
आणि मग पालकांच्या लक्षात येते की आपण फसलो गेलो आहोत. असे काही ठकबाज श्रीरामपूर तालुक्यात फिरत असल्याची माहिती मिळत आहे. अनेकजण फसतात अनेकजण ठकास महाठक भेटतात. मात्र याबाबत अद्याप कोणीही पोलिसात तक्रार केली असल्याची माहिती उपलब्ध नाही.
असे वसुली बहाद्दर वसुलीसाठी घरी आले की नागरिकांनी त्यांचे गुपचूप फोटो काढून ठेवावेत. गप्पात गुंतवून पोलिसांना पाचारण करून पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.