दगड व खडी वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा या अवजड वाहनाखाली सापडून स्टोन क्रशरवरील परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एस. आर. स्टोन क्रशरच्या आवारात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली.
मनोज प्रकाश कुमार (मूळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. खंडाळा, ता. नगर) असे मयत कामगाराचे नाव आहे. मयत मनोज प्रकाश कुमार हा नगर तालुक्यातील खंडाळा शिवारात राहुल लोटके यांच्या एस. आर. स्टोन क्रशर येथे कामास होता.
बुधवारी दुपारी क्रशरवर वाहन चालक दत्तात्रय मल्हारी वाडेकर (रा. धोंडेवाडी, वाळकी, ता.नगर) हा टाटा कंपनीच्या हायवा घेवून खडी भरण्यासाठी क्रशर वर आला होता. वाहनात खडी भरल्यावर तो तेथून जात असताना, त्यांच्या वाहनाखाली सापडून मनोज प्रकाश कुमार हा मयत झाला.
या प्रकरणी मयताचा साथीदार दिलीप माधव तडोले (मूळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. खंडाळा, ता. नगर) याने रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी वाहन चालक दत्तात्रय मल्हारी वाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.