२२ जानेवारी २०२५ टाकळीभान : दुचाकी आडवी आल्याने मोपेडस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो गाडी लिंबाच्या झाडाला धडकली.यात मोपेडचालक व दोन महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.नेवाशातील विवाह सोहळा उरकून बोलेरो टाकळीभानकडे येत असताना काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळीभान शिवारात हा अपघात झाला.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाचा विवाह प्रवरा संगम येथे आयोजित केला होता.विवाह सभारंभ आटोपून टाकळीभान येथे वऱ्हाडी बोलेरो गाडीत परतत होते.नेवासा- श्रीरामपूर राज्यमार्गावर टाकळीभान शिवारात गाडी आली.
त्याच वेळी स्वस्तीक ट्रेडींग या दुकानासमोर दिगंबर पांडूरंग शिंदे (वय ६५, राहाणार गुजरवाडी) हे टीव्हीएस मोपेडवरून जात होते.ते अचानक बोलेरो समोर आले.त्यांना वाचविण्याचा प्रयत्न बोलेरो चालकाने केला; परंतु चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो मोपेडला धडकून बाजुच्या लिंबाच्या झाडाला धडकली. यात गाडीचा पत्रा उचकटला. त्यामुळे गाडीत बसलेल्या धुमाळ यांच्या नातेवाईकांना जबर ईजा झाली.
यात बोलेरो जीपचा चक्काचूर झाला, तर मोपेडचेही मोठे नुकसान झाले. बोलेरोमधून एकूण आठजण प्रवास करीत होते. वर्दळीच्या ठिकाणी हा आपघात झाल्याने तरुणांनी त्वरीत मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी जखमींना बोलेरो जीपमधुन बाहेर काढले व तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान मोपेडस्वार दिगंबर शिंदे, तसेच बोलेरोमधील सातारा येथील नातेवाईक देवयानी कुंडलिकराव जाधवराव (वय ६५) व गोपिका दिलीपराव जाधवराव (वय ५०, रा. भोईन, ता. वाई, जि. सातारा) या दोन महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इतर भाजपच्या जिल्हा महिला सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, प्रकाश धुमाळ, जनार्दन जाधवराव, सुशील इंगळे, दिलीप जाधवराव, उज्वला इंगळे जखमी झाले आहेत.
त्यातील दोन गंभीर जखमींना अहिल्यानगर येथे हलवण्यात आले असून उर्वरित चार जणांना श्रीरामपूरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनिरीक्षक मुरकुटे, हेड कॉन्स्टेबल रवींद्र पवार, पोलीस नाईक संतोष कराळे, पोलीसमित्र बाबा सय्यद घटनास्थळी पोहचले व अपघाताची माहिती घेतली.