३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : भाचीला घरी नेण्यासाठी आलेल्या मामाला चौघांनी शिवीगाळ दमदाटी, मारहाण करुन त्यातील एकाने कानाला कडाडून चावा घेत कानाचा लचका तोडला.ही घटना केडगाव देवी मंदिर परिसरात मंगळवारी (दि.३१) रात्री ९.३० च्या सुमारास घडली.
याप्रकरणी विजय खंडके (पूर्ण नाव माहित नाही), गणेश बनारसे (रा. संदिप हॉटेल जवळ, केडगाव), भावड्या कोतकर व अन्य एकजण अशा चौघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजु लक्ष्मण सोनवणे (वय ३५, रा. निशा लॉन्स, केडगाव, मुळ रा. घाटनांदूर, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नातेवाईक केडगाव देवी मंदिराजवळ राहतात.
त्यांनी २७ डिसेंबर रोजी फिर्यादी यांची अनाथ असलेली १० वर्षीय भाची हिला दुसऱ्या नातेवाईकांकडून केडगाव येथे आणले होते व तिचे मामा राजु सोनवणे यांच्याकडे सोडवेन, असे ते म्हणाले होते. परंतु ५ दिवस होऊन गेले तरीही तिला त्यांनी घरी आणून सोडले नाही त्यामुळे फिर्यादी सोनवणे हे भाचीला घेण्यासाठी मंगळवारी (दि.३१) रात्री ९.३० च्या सुमारास केडगाव देवी परिसरात गेले व भाचीला मी घ्यायला आलो आहे,असे सांगितले.
याचा राग आल्याने ते नातेवाईक व विजय खंडके (पुर्ण नाव माहित नाही), गणेश बनारसे (रा. संदिप हॉटेल जवळ, केडगाव) यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.आम्ही तुला तुझी भाची देणार नाही.आम्ही तिला सांभाळून ती मोठी झाल्यावर माझ्या मुलाबरोबर लग्न लावून देणार आहे.
त्यामुळे तू येथून निघून जा, असे त्या नातेवाईकांनी सोनवणे यास सुनावले. मात्र, माझी भाची माझ्या ताब्यात द्या. मी लगेच जातो, सोनवणे म्हणाले असता त्या नातेवाईकांनी सोनवणे यांना धरले व खाली पाडून मारहाण केली.विजय खंडके याने त्यांच्या अंगावर बसून डाव्या कानाचा लचका तोडला.
हे भांडण चालू असताना त्यांचा घरमालक भावड्या कोतकर यानेही शिवीगाळ करुन मारहाण केली, से फिर्यादीत म्हटले आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.