Ahmednagar Breaking : नगर शहरातील गुंडागर्दी, गुन्हेगारी या घटना कमी होताना दिसत नाहीत. टोळीयुद्ध, हाणामारी आदी घटना वारंवार घडत असून आता अगदी खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी गोष्टी शहरात घडू लागल्या आहेत. आता नगर शहरातून बोल्हेगाव परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुधवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाउंसर म्हणून काम करीत असलेल्या तरुणीचा कॉलेजमधील ओळखीच्या मुलाने घरी येऊन धारदार शस्त्राने गळा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी सोमनाथ वैरागर (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल अशोक मोहिते असे हल्ला झालेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत सूरज अशोक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची बहीण कोमल बाउंसर म्हणून काम करते. तिची वैरागर याच्याशी कॉलेजमध्ये असताना ओळख झाली होती. तो तिला त्रास देत असल्याचे कोमलने फिर्यादीला सांगितले होते. तो बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कोमलच्या घरी आला.
त्याने कोमलच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. गळ्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे कोमलने भाऊ सूरज यास फोन करून बोलावून घेतले. सूरज व त्याच्या मित्रांनी कोमलला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपीने कोमल हिच्या गळ्यावर वार केला. त्यात ती जखमी झाली असून, हा हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असू शकते, याचा शोध तोफखाना पोलिस घेत आहेत.
नगर शहरात वाढली गुंडागर्दी
ऐन निवडणुकीच्या काळात नगर शहरात दोन गटात राडा झाला. काल पुन्हा भर बाजारात एकाला मारहाण झाली. या आणि अशा अनेक घटना वारंवार नगर शहरात घडताना दिसत आहेत. त्यामुळे नगर शहरात गुंडागर्दीचा वाढत चाललेला आलेख नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनत चाललेला आहे.