अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेले नुकसान यामुळे नेवासे तालुक्यातील सुरेगाव येथील उपसरपंच व शेतकरी सुनील वसंतराव शिंदे (वय ५०) यांने प्रवरासंगमच्या गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
सुरेगाव येथील सुनील शिंदे हे कष्टाळू प्रगतशील शेतकरी होते. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेले पीक डोळ्यादेखत जात असल्याने त्यातच कर्जबाजारीपणा यामुळे त्यांनी गोदावरी नदीवरून उडी घेऊन आत्महत्या केली
असल्याचे सांगण्यात येते. सुरेगावचे उपसरपंच व बोरगाव सोसायटीचे उपाध्यक्ष असलेले सुनील शिंदे हे चार दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते.
याबाबत बेपत्ता झाल्याची खबर नातेवाईकनी नेवासे पोलिस स्टेशनला दिली होती. मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला.
मृत सुनील शिंदे यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सुरेगाव येथील शिंदे वस्तीवर सुनील शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.