अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- राहुरी शहर हद्दीतील बारा ते पंधरा वयोगटातील पाच मुले गणपती घाट परिसरात मुळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाच मुलां पैकी अमर व सुमित हे दोघे सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडलीय.
काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्री राहुरी तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून नदी नाल्यांना पूर आले आहेत. मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.
नदीला आलेला पाण्याचा पूर पाहण्यासाठी लहान मुलं व नागरीकांची गर्दी होत आहे. आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान राहुरी शहरातील लोहार गल्ली परिसरात राहणारे अमर चंद्रकांत पगारे, सुमित चंद्रकांत पगारे, समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे तसेच रिहान भैय्या शेख हे बारा ते पंधरा वयोगटातील मुलं गणपती घाट परिसरात मुळा नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले होते.
पाण्यात अंघोळ करत असताना सुमित पगारे वय १२ वर्षे हा पाण्यात वाहू लागला. ते पाहून त्याचा भाऊ अमर वय १५ वर्षे याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू अमर चंद्रकांत पगारे व सुमित चंद्रकांत पगारे हे दोघे सख्खे भाऊ पाहता पाहता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पंकज नारद, उत्तम आहेर, शहारूख सय्यद, सोन्याभाई सय्यद, सिद्धार्थ करडक या तरूणांनी पाण्यात वाहून जाणाऱ्या अमर व सुमित यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू ते दोघे भाऊ काही क्षणात पाण्यात दिसेनासे झाले.
पाण्यात बूडालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर त्यांच्या आईने व बहिनीने हंबरडा फोडला होता. आई काही क्षणातच बेशुद्ध पडली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील विभागीय पोलिस अधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, तहसिलदार फसियोद्दीन शेख, नगरपरिषद मधील महेंद्र तापकिरे आदिंसह महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशानाचे कर्मचारी तसेच नगरसेवक सोन्याबापू जगधने,
अक्षय तनपूरे, राजेंद्र बोरकर, सुनिल पवार, दादासाहेब करडक हे घटनास्थळी दाखल झाले होते. काही तरूणांनी बराच वेळ पाण्यात बुडालेल्या त्या दोन्ही भावांचा पाण्यात शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. उशीरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.