अहमदनगर क्राईम

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचा खून करून चेहऱ्यावर केमिकल टाकून ओळख पुसण्याचा प्रयत्न..’या’ तालुक्यातील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात एका ३५ ते ४० वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह वनविभागाच्या जमिनी शेजारी फेकून दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सुरेगाव शिवारात ३० वर्षीय अज्ञात महिलेच्या डोक्यावर हत्याराने मारुन अंगावरील साडीच्या पदराने तिचा गळा आवळुन महिलेस गळफास देऊन मारत महिलेची ओळख पटू नये म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर केमिकल टाकून चेहरा विद्रूप केला आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. सुरेगाव येथील दत्तात्रय संपत रोडे यांच्या जमिनीच्या बांधावर मृतदेह दिसताच सुरेगावचे पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांनी पोलिसांना माहिती कळवली.

पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, फॉरेन्सिक तसेच श्वान पथक पाचारण करत वरिष्ठांना कल्पना दिली.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक दुधाळ यांना तपासाबाबत सूचना दिल्या.

पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथे पाठविण्यात आला असून, खुनातील मारेकऱ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान बेलवंडी पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office