अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- तुटपुंज्या पगारामुळे आर्थिक डोलारा चालविणे मुश्किल होऊ लागल्याने आजवर अनेक बस कर्मचाऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.
यातच अशीच एका धक्कादायक घटना जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून घडल्याचे समोर येत आहे. शेवगाव परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.
या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली आहे.