Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात गुन्हेगारी वृत्तीने आता उचांक गाठायला सुरवात केली आहे. आता अहमदनगर शहरातून ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास काटवन खंडोबा ते आगरकर मळा रोडवर असलेल्या शेतातील पत्र्याच्या खोली समोर घडली.

अशोक कुमार अमरजित (वय अंदाजे ४०, मूळ रा. बसोली, जि.गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे मयताचे नाव आहे. मयत अशोक कुमार आणि आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा (रा. बांकी, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) हे दोघे परप्रांतीय कामगार कामानिमित्त नगरमध्ये आलेले होते.

ते काही दिवसांपासून काटवन खंडोबा ते आगरकर मळा रोडवर असलेल्या विश्वास रंगनाथ डांगे (रा. ढोर गल्ली, माळीवाडा) यांच्या मालकीच्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. मंगळवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाले.

या वादातून आरोपी प्रमोद विश्वकर्मा याने अशोक कुमार याच्या डोक्यात दगडाने मारले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. योगिता कोकाटे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या प्रकरणी खोली मालक विश्वास डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रमोद विश्वकर्मा याच्याविरुद्ध भा.दं. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि. प्रताप दराडे हे करीत आहेत.