अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : भर शहरात इम्पिरियल चौकात तरुणावर कोयत्याने सपासप वार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भर शहरात इम्पिरियल चौकात तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. आमच्या भांडणात मध्ये का पडतो असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार केले आहेत.

ही घटना गुरुवारी (दि.३०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि.३१) रात्री उशिरा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक बाळासाहेब नवगिरे (वय २३, रा. १५ ऑगस्ट कॉलनी, भूषणनगर, केडगाव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नवगिरे हा हाजी इब्राहीम इस्टेट बिल्डींग मध्ये एका ठिकाणी कामास आहे, तो गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कामावरून घरी जाण्यासाठी निघाला होता. मोटारसायकल वर बसत असताना तेथे जहीर इक्रम सय्यद, लैला जहीर सय्यद व १ अनोळखी इसम असे तिघेजण आले. त्यातील जहीर याच्या हातात कोयता होता.

ते सर्वजण नवगिरे जवळ आले व तू आमच्या भांडणात मध्ये का पडतो, थांब तुला आता जीवे ठार मारतो असे म्हणत त्याने नवगिरेवर कोयत्याने वार केला. तो वार त्याच्या डोक्यात लागल्याने तो जखमी होवून खाली पडला त्यावेळी लैला व एका अनोळखी व्यक्तीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी नवगिरे याने मदतीसाठी आरडा ओरडा केल्यावर तेथे अकबर सय्यद, सतीश सातपुते व इतर त्याच्या ओळखीचे लोक जमा झाले. त्यावेळी तिघेही हल्लेखोर तेथून पळून गेले. जखमी नवगिरे याला त्याच्या ओळखीच्या लोकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत नवगिरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून शुक्रवारी रात्री उशिरा तिघा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील गुंडगर्दिचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. टोळीयुद्धासारखे प्रकार ताजे असतानाच पुन्हा एकदा भर शहरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी शहरातील गुंडागर्दीचा बिमोड करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ahmednagarlive24 Office