अहमदनगर क्राईम

Ahmednagar News : अँप डाऊनलोड करण्यास सांगून नगरच्या नोकरदारास घातला सव्वादोन लाखांना गंडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा काही भामटे घेत आहेत. आपण बँकेच्या कस्टमर केअर सेंटर मधून बोलतोय, असे सांगत बँक खात्याविषयीची तक्रार नोंदविण्यासाठी एक अँप डाऊनलोड करायला सांगितले. दरम्यान संबंधीताचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून चक्क २ लाख २८ हजारांची रक्कम ऑनलाईन काढुन घेत नगरमधील खाजगी नोकरदारास गंडा घातला आहे. राजेंद्र राधाकिसन कानडे (रा. कौठीची तालीम, माळीवाडा) असे याप्रकरणी फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत राजेंद्र राधाकिसन कानडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कानडे यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते आहे. त्यांच्या मोबाईलवर २१ मे रोजी सकाळी ८.१० च्या सुमारास बँक खात्यातून ९६ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा ते पैसे खात्यात क्रेडीट झाल्याचा मेसेज आला.

हे मेसेज पाहून त्यांनी शंका आली, तयामुळे शंका निरसन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरवर फोन केला. मात्र त्यांचा फोन कुणीही घेतला नाही. परंतु थोड्या वेळाने ११.५४ वाजता एका अनोळखी व्यक्तीने त्यांना फोन केला व आपण बँकेच्या कस्टमर मधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमची काही तक्रार असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कस्टमर केअर हे अँप डाऊनलोड करून त्यावर तुमची रीतसर तक्रार नोंदवा असे सांगितले.

त्या भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी कानडे यांनी अँप डाऊनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सदर व्यक्तीने ४ वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून कानडे यांना फोन करत तुमची तक्रार नोंदवून घेत असल्याचे सांगितले. दुपारी १.२४ च्या सुमारास कानडे यांच्या बँक खात्यातून १ लाख २८ हजार आणि नंतर १ लाख अशी २ लाख २८ हजार रुपयांची रक्कम कुठलाही डेबिट झाल्याचा मेसेज आला.

त्यानंतर ही रक्कम कोणी काढुन घेतली याबाबत त्यांनी बँकेत जावून तसेच आलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काहीही माहिती मिळाली नाही. तेव्हा आपली सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office