Ahmednagar News : मित्राने दोस्ताला गांजाचे व्यसन लावले, त्याच मित्राने दोस्ताच्या वडिलांना शिवीगाळ केली, दोस्ताने मित्राची कोयत्याने हत्या केली.. असा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला.
पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील खून प्रकाणात मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. दारू व गांजा पिण्यासाठी वारंवार पैसे मागत असल्याने त्याच्या डोक्यात काठीने व कोयत्याने वार करून त्याचा खून केला. याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाने एक आरोपी ताब्यात घेतला आहे.
अमोल नवनाथ आठरे (वय २०, रा. कौडगांव आठरे, ता. पाथर्डी, जि.नगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीस पुढील तपासाकामी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे अविनाश बाळू जाधव हा त्याच्या घरी पढवी मध्ये झोपला असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचे डोक्यात वार करून खुन केला आहे अशी फिर्याद पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केला असता मयत अविनाश जाधव याचे कोणासोबत यापुर्वी वाद होते काय? याबाबत माहिती काढली असता मयताचे व मयताचा मित्र अमोल नवनाथ आठरे रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी याचेसोबत वाद झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अमोल नवनाथ आठरे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस केली. त्यात त्याने सांगितले अविनाश जाधव याने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते तसेच अविनाश जाधव हा मला नेहमी गांजा ओढण्यासाठी व दारु पिण्यासाठी पैसे मागायचा. मी व अविनाश जाधव मित्र असल्याने आम्ही एकमेकांच्या घरी जात असायचो.
अविनाश जाधव यास दारु व गांजा ओढण्याचे व्यसन असल्याकारणाने माझे आई वडिल मला व अविनाश जाधव यास बऱ्याचदा रागावत असत. याचा राग असल्याने त्याने माझे वडिल दुध विकत असलेल्या ठिकाणी तिसगांव येथे जावुन त्यांना शिवीगाळ केली व मारहाणीची धमकी दिली.
याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता शनिवार (दि.४) रोजी रात्री १२ वा.चे सुमारास ऊस तोडण्याचा कोयता घेवुन गेलो. अविनाश जाधव हा त्याचे पडवीमध्ये झोपलेला होता. मी माझेकडील बाभळीचे काठीने त्याचे डोक्यामध्ये मारले, व दोघामध्ये झटापट झाली व अविनाश जाधव हा मला मारण्यासाठी काहीतरी हत्यार शोधत असतांना मी माझे गाडीवर ठेवलेला कोयत्याने त्याचे डोक्यावर, पाठीवर वार केले असल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीने सांगितले.