Ahmednagar News : अहमदनगरमधील व्यावसायिकाची आठ कोटींची फसवणूक, ‘त्या’ मल्टीस्टेटच्या चेअरमन, मॅनेजरवर गुन्हा

Pragati
Published:
fraud

Ahmednagar News : जमीन-खरेदी विक्री व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ही घटना घडली होती.

याप्रकरणी बुधवारी (३० मे) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बबनराव जाधव (वय ४१, रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा, नगर) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

जाधव यांच्या फिर्यादीवरून साईराम अर्बन मल्टीस्टेट, बीड येथील शाहीनाथ विक्रमराव परभणे (रा. माळी वेस, बीड), संत भगवान बाबा मल्टीस्टेट, मुख्य शाखा बालमटाकळी, शेवगावचे चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य (रा. बालमटाकळी, ता. शेवगाव),

अरकान प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड (रा. नाशिक), सचिन शिवराम गरदास (रा. श्रमिक नगर, सावेडी), संत भगवान बाबा मल्टीस्टेटचे मॅनेजर नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, नगर), साईराम अर्बन मल्टीस्टेटचे मॅनेजर शरद सीताराम कुलकर्णी (रा. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय, नगर व संत भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटी, चाणक्य चौक येथे कटकारस्थान करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीला ५ कोटी ४६ लाख रुपयांचे चेक दिले. मात्र, ते न वटता परत आले. तसेच, दुय्यम निबंधक कार्यालयात खोटे व बनावट दस्त करून फिर्यादीची जमीन हडप करून त्यांना पैसे न देता

खोटा आर्थिक व्यवहार दाखवला. एकूण ८ कोटी ५ लाख रुपये फिर्यादीला न देता, त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe