Ahmednagar News : नगर शहरातील गुन्हेगारी घटना कमी होण्याचे चिन्ह दिसेनात. मागील काही घटना ताजा असतानाच आता एका टोळीचा थरार समोर आला आहे. सारसनगर परिसरात सराईत गुन्हेगार शुभम उर्फ मडक्या धुमाळ व त्याच्या साथीदारांनी धुमाकूळ घातला असून त्या टोळीने रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अडवून लुटले आहे.
रॉड, दांडके व तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील सोने काढून नेले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास सारसनगरच्या त्रिमुर्ती चौकात घडली असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लुटमार करणाऱ्या सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजाता सचिन हिंगे (वय ३९, मुळ रा. शिराढोण ता. नगर, हल्ली रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीत त्यांच्यासह त्यांची बहिण मनिषा कासार व मेव्हणा अर्जुन कासार जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी फिर्यादी व इतर दोघे दुचाकीवरून जात असताना सारसनगरमधील छबु कांडेकर यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांना अडवले.
‘आमच्याकडे मागे वळून काय बघता’ असे म्हणून फिर्यादीच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घेतले. फिर्यादीसह त्यांची बहिण व मेव्हण्यास शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी, दांडके, रॉड व तलवारीने मारहाण करून दरोडा टाकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादी वरून पोलिसांनी ऋषिकेश अशोक बडे (रा. भगवान बाबा चौक, सारसनगर) शुभम उर्फ मडक्या मारुती धुमाळ, निलेश उर्फ काळ्या मारुती जायभाय, अविनाश विश्वास जायभाय, अजित केकाण, प्रतिक उर्फ बाबू अर्जुन गर्जे (सर्व रा. सारसनगर) यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ३९५ सह आर्म अॅक्ट ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील अविनाश विश्वास जायभाय व प्रतिक उर्फ बाबू अर्जुन गर्जे या दोघांना गुरुवारी (दि.२३) सायंकाळी पकडण्यात आले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.