Ahmednagar News : लग्नासाठी वडील मुलगी देत नसल्याने संगमनेर येथील एका मौलानाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या वडिलांचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक उलगडा पोलीस तपासात उघड झालाय. साधारण आठ महिन्यापूर्वी झालेल्या व पुरेशा पुराव्याभावी प्रथमतः अकस्मात दाखल केलेल्या त्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केलाय.
हे हत्याकांड मालदाड भागातील वनात घडलेले होते. त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मयत अन्सारी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले परंतु त्यांच्या हाती सबळ पुरावा नसल्याने प्रथमतः अकस्मात दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. आता त्या गुन्हातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अधिक माहिती अशी: साधारण आठ महिन्यांपुर्वी उत्तरप्रदेश येथील मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी हे मौलाना चंदा मागण्यासाठी संगमनेर शहरात आला होता. तो जवळच्या एका मशिदीत मौलाना म्हणून काम करत असल्याने अन्सारी कुटुंबाने त्यास राहण्यास थोडी जागा दिली.
या दरम्यान मोहंमद याने अन्सारी यांच्या मुलीसोबत लग्नाची मागणी घातली. परंतु त्यांनी नकार दिला. दरम्यान त्यानंतर अकोले तालुक्यातील देवठाण येथे मशिदीत मौलाना म्हणून काम करायला लागला तसेच त्यानंतर तो कल्याणला देखील गेला. परंतु विवाहास नकार दिल्याचा राग त्याच्या मनात होताच. दरम्यान 3 एप्रिल २०२४आहतेशाम अन्सारी घराबाहेर गेले होते.
परंतु ते दुसऱ्या दिवशीही घरी न आल्याने अन्सारी यांच्या पत्नीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंग दाखल केली होती. आहतेशाम इलियास अन्सारी यांचा २४ एप्रिल २०२४ रोजी मालदाड येथील वनात मृतदेह सापडला. वैद्यकीय अहवालानुसार मयत अन्सारी यांच्या अंगावर जखमा आणि गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे व्रण असल्याने ही हत्या असल्याचे दिसत होते. परंतु कोणताही सबळ पुरावा नसल्याने, प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करुन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
या दरम्यान आरोपी मोहंमद जाहिद यास ही घटना समजून देखील तो संगमनेरला त्या कुटुंबास भेटण्यास आला नाही व आपल्या जबाबात दि. १ ते ३ या दरम्यान कल्याण येथे होतो असेही त्याने सांगितले होते. परंतु त्याचे लोकेशन हे संगमनेर दाखवत असल्याने अशा काही संदिग्ध चुका आरोपी मोहंमद जाहिद याने केल्या.
त्यामुळे हा गुन्हा त्यानेच केल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर काही पुरावे जमा करुन पोलिसांनी मोहंमद जाहिद यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मित्रांच्या मदतीने मुलीचे वडील आहतेशाम इलियास अन्सारी (रा. मदिनानगर, जुना जोर्वे रोड, संगमनेर) यांची मालदाडच्या जंगलात नेऊन हत्या केली असल्याचे समोर आले.
याप्रकरणी मौलाना मोहंम्मद जाहीद मोहंमद युनुस मुलतानी (रा. साहरणपुर, उत्तरप्रदेश) मोहंमद इम्रान निसार सिद्दकी (रा. कल्याण) व मोहंमद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदाद अन्सार, ता. धामपुर, जि. बिजनौर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.