Ahmednagar News : प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी (दि.१९) सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश (वय १२) आणि प्रणव (वय ८) या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून याबाबत गावकऱ्यांना शंका होती. तसेच अनेकजण याबाबत दबक्या आवाजात वेगळीच चर्चा करत होते.
रितेश आणि प्रणव या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू म्हणजे दुर्घटना नसून घातपातच आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते.
दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे-पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला.
पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले.यात मृत मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) हिचे सचिन बाबजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे या दोघांना हि दोन्ही मुले नकोशी झाली होती.त्यामुळे या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी शाळेला सुटी होती त्यामुळे हे दोघे घरापासून काही अंतरावर सायकल खेळत होते. नंतर ते त्यांच्या एका नातेवाईकांच्या घरी गेले. तेथे काही काळ थांबल्यानंतर ही दोघे जवळच असणार्या शेततळ्याकडे गेले. तेथे खेळत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला.
तो बुडत असल्याचे पाहून दुसरा त्यास वाचविण्यासाठी गेला. मात्र, दोघे पाण्यात बुडाले आणि मयत झाले. काही काळानंतर शेततळ्यात चपला तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसल्या. दरम्यान दोघांचा मृत्यु झालेला होता. त्यानंतर आईचा आक्रोश पाहून अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. त्याच दिवशी येथील अनेक नागरिकांना शंका आल्या होत्या, परंतु तसे कोणी दाखवता आरोपीना गाफिल ठेवले.