Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसास मारहाण, कारणही धक्कादायक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar News : तुम्ही माझ्या फिर्याद नातेवाईकांची फिर्याद का घेत नाहीत असे म्हणत एका महिलेने महिला ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली. ठाणे अंमलदार महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या इतर महिला पोलिसांना तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली व तुम्हाला सर्वांना कामालाच लावते असा दम दिल्याची घटना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी घडली.

याबाबत ठाणे अंमलदार असलेल्या महिला पो.हे.कॉ. जयश्री फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सीमा गणेश काळे (रा. ब्रम्हतळे, भिंगार) या महिले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी महिला पो.हे.कॉ. जयश्री फुंदे या ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर कार्यरत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास सीमा काळे ही महिला पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात गेली.

तेथे फुंदे यांना तुम्ही माझ्या नातेवाईकांची फिर्याद का घेत नाही अशी विचारणा केली. त्यावेळी फुंदे या त्या महिलेस समजून सांगत तुमची फिर्याद व्यवस्थित सांगा असे म्हणाल्या असता त्याचा राग येवून त्या महिलेने फुंदे यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण सुरु केली.

फुंदे यांची गचांडी पकडून शर्टचे बटन तोडले. तसेच या झटापटीत त्यांचे मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. तुला आता कामालाच लावते असे म्हणत ती फुंदे यांना मारहाण करत असताना त्यांच्या बचावासाठी तेथे असलेल्या महिला टी. एस. कांबळे, के.एस. काशीद, सहाय्यक फौजदार कैलास सोनार हे आले असता सीमा काळे हिने या तिघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.

या प्रकरणी महिला पो.हे.कॉ. जयश्री फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी सीमा गणेश काळे या महिले विरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ३५२, ३२३, ४२७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe