Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही कमी होतानाचे चित्र दिसेना. मारहाण, हल्ले आदी अनेक गैरप्रकार सध्या वाढीस लागले आहेत. आता पोलीस पाताळानेच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत एकावर शस्त्राने सपासप वार केले.
धक्कादायक म्हणजे यात त्या व्यक्तीला १४ टाके पडले आहेत. जखमीची पत्नी पतीला वाचवण्यासाठी गेली असता या महिलेलाही पोलिस पाटील याने मारहाण केली.
ही घटना नेवासे तालुक्यात जळके बुद्रुक येथे घडली. पोलिस पाटील अशोक पुंड असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी (६ एप्रिल) रात्री ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. बळीराम दत्तात्रय नाईक (वय ५०) असे जोखमीचे नाव आहे.
जळके बुद्रुक येथील बळीराम दत्तात्रय नाईक (वय ५०) हे शनिवारी रात्री गावातील लक्ष्मी मंदिराजवळ बसले होते. त्यावेळी गावचे पोलीस पाटील अशोक पुंड हा मद्यधुंद अवस्थेत मंदिराजवळ आला. मंदिरासमोर बसलेल्या बळीराम नाईक यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिस पाटलाच्या मारहाणीतून नाईक याने आपली सुटका करून घरी निघून गेले. पुन्हा हा पोलिस पाटील पुंड याने घरी येवून लोखंडी शस्त्राने नाईक याच्या डोक्यात सपासप वार केले, जखमीची पत्नी सुनिता नाईक यांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करत असताना पोलिस पाटलाने जखमीच्या पत्नीच्या दोन थोबाडीत मारले.
नेवासे पोलिसांनी रात्री पोलिस पाटलाला नेवासे पोलिस ठाण्यात आणून पुन्हा सोडून दिल्याची माहिती जखमीच्या पत्नीने दिली. जखमी बळीराम नाईक यांच्यावर नेवासे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात पोलिस पाटील अशोक पुंड याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.