Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील खटकळी येथील स्थनिक गुंडाकडून शेजारी राहणाऱ्या विधवा महिलेस मारहाण करून तिचे घर पेटवून दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. बेलापुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला.
मात्र गुंडाच्या दहशतीमुळे संबंधित महिला तक्रार देत नसल्याने पोलिसांनी कुठलीही कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली त्यावेळी दर्शवली होती अशी माहिती मिळाली आहे.
बेलापूरपासून जवळ असलेल्या खटकळी गावात पोलिस रेकॉर्डवरील स्थानिक गुंड आहे. सोमवारी दुपारी संबंधित महिलेशी या गुंडाचे वाद झाले. त्याने महिलेस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही माहिती मिळाल्यानंतर महिलेच्या रामगढ येथे राहणाऱ्या भावांनी त्याची भेट घेतली. त्यांच्याबरोबरही त्याची बाचाबाची झाली.
याचाच राग मनात धरून रात्री उशिरा त्याने तालुक्यातील खंडाळा व श्रीरामपूर येथील काही गुन्हेगार साथीदारांना बोलावून घेतले. रात्री संबंधित महिलेला मारहाण केली. तसेच तिला घराबाहेर आणून तिच्या घरात जाळपोळ केली.
गुंडांच्या दहशतीमुळे शेजारचे कोणीही मदतीला आले नाही. गुंड निघून गेल्यानंतर आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
एका संघटनेने याबाबत पोलिसांकडे पाठपुरावा केला. सकाळी बेलापूर पोलिस चौकीचे हवालदार घटनास्थळी गेले. परंतु संबंधित महिलेने दहशतीच्या भितीने फिर्याद देण्यास नकार दिला. यावरून आरोपीची जरब परिसरात किती आहे, याचा अंदाज येतो
दोन गटात राडा
सोमवारी या परिसरात दोन गटात राडा झाल्याचे सांगण्यात आले. यातून वाहनांची मोडतोड, जाळपोळ असे प्रकार घडले. दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांवरील दबाव वाढविला होता अशी माहिती मिळाली आहे.
‘त्याच्यावर’ अनेक गुन्हे…
खटकळी येथील या गुंडावर मारहणार करणे, जाळपोळ करणे, सोनसाखळी चोरणे यासह इतर गुन्हे श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्याच्या दहशतीमुळे त्याच्याविरोधात कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही अशा माहिती समजली आहे.