गायींची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता गो-तस्करांनी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी हे त्यांच्या मोटारसायकल (क्र. एम. एच १७, सी.एन ०८८९) वरून निमगाव जाळी येथून औरंगपूर रस्त्याने गोगलगावकडे जात होते.
त्यावेळी त्यांना औरंगपूर शिवारातील पाटाच्या लगत टेम्पो (क्रमांक एम. एच-२०, ई. जी-९४८३) दोन गायी व चार वासरांची वाहतूक करताना दिसला. चौधरी यांनी टेम्पोला थांबण्याचा इशारा केला. मात्र, तो थांबला नाही.
काही अंतर पुढे जाऊन त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करुन पाठीमागून येत असलेल्या टेम्पोला त्या दोघांनीही पुन्हा थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने त्या दोघांच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत केला.
यात सागर चौधरी याला गंभीर दुखापत झाली व त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरून समद गणीमहम्मद शेख (रा. आश्वी) व साहिल सय्यद (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.